जळगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
भरधाव पिकअपच्या धडकेत सासू-जावयाचा जागीच मृत्यू
पहूर, ता. जामनेर : पहूर–शेंदुर्णी मार्गावर घोडेश्वर बाबा मोरीजवळ भरधाव छोटा हत्ती पिकअप वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सासू आणि जावयाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी (दि. १२) दुपारी सव्वाच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सातगाव डोंगरी (ता. पाचोरा) येथील राजू बाबुलाल परदेशी (वय ५६) हे त्यांच्या घरी कार्यक्रमानिमित्त आलेल्या सासूबाई विमलबाई ओंकार परदेशी (वय ७०) यांना त्यांच्या मूळ गावी गोंडखेल (ता. जामनेर) येथे सोडण्यासाठी पल्सर दुचाकीने (क्र. एमएच १९ ईएच ०४९९) पहूरमार्गे जात होते. दरम्यान, घोडेश्वर बाबा मोरीजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या छोटा हत्ती पिकअप वाहनाने (क्र. १८ बीझेड ५५०८) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत राजू परदेशी आणि विमलबाई परदेशी हे दोघेही गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी त्यांना तातडीने पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयात दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले.
एकाच कुटुंबावर दुःखाचा डोंगर
विमलबाई परदेशी यांचे पती आणि दोन मुलांचे यापूर्वीच निधन झाले होते. त्यामुळे त्या सध्या त्यांची मुलगी देवकाबाई यांच्याकडे राहत होत्या. दरम्यान, या अपघातात त्यांचाही मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राजू परदेशी यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.
विमलबाई परदेशी यांच्यावर सोमवारी सायंकाळी सात वाजता गोंडखेल येथे अंत्यसंस्कार करण्यात आले, तर राजू बाबुलाल परदेशी यांच्यावर मंगळवारी सकाळी दहा वाजता सातगाव डोंगरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.
या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांच्या खबरीवरून पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी योगेश सुतार पुढील तपास करीत आहेत.





