छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
चिखली :माणुसकी जिवंत आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा चिखली शहरात आला आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील एका निराधार वृद्ध दाम्पत्याला मानवसेवा प्रकल्पाने मायेचा आधार दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या आजी-आजोबांना दोन मुले व एक मुलगी आहे. मुले स्वतःच्या संसारात व्यस्त असल्याने आई वडिलांची जबाबदारी मुलीने उचलली. परंतु दुर्दैवाने मुलगी स्वतः विधवा असून तीही निराधार आहे. त्यामुळे शेवटी या वृद्ध आई-वडिलांना मुलीचे घर सोडून रस्त्यावर भटकंती करावी लागली. अशाच अवस्थेत ते चिखली शहरात आले.
चिखली बसस्थानक परिसरात भटकत असताना काही सामाजिक कार्यकर्त्यांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. कार्यकर्त्यांनी त्यांची आपुलकीने विचारपूस केली व त्यांना चहा-नाश्ता दिला. त्यावेळी वृद्ध आजीच्या तोंडून निघालेले शब्द सर्वांच्या काळजाला भिडले – “आम्हाला कुठे आश्रम असेल तर सांगा, आम्ही भिक्षा मागणारे नाही, आम्हाला फक्त दोन वेळचं जेवण आणि डोक्यावर छत पाहिजे.”
या घटनेची माहिती तात्काळ मानवसेवा मल्टी पर्पज फाउंडेशन चिखली (र.नं. महा 197/F-19939/25) द्वारा संचालित मानवसेवा प्रकल्प चे संचालक *प्रशांत अविनाश डोंगरदिवे* यांना देण्यात आली. फाउंडेशनच्या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेत या निराधार आजी-आजोबांची भेट घेतली.
सदर वृद्ध दाम्पत्याला चिखली पोलिसात माहिती देऊन पोलिसांच्या सहकार्याने मानवतेच्या भावनेतून त्यांना तात्काळ *तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर* येथे आश्रय देण्यात आला आहे. सध्या त्यांची वैद्यकीय तपासणी, जेवण, कपडे व निवासाची सर्व व्यवस्था संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी संस्थेच्या वतीने सांगण्यात आले की, “समाजातील प्रत्येक निराधार वृद्ध हा आमच्या कुटुंबातील सदस्य आहे. अशा गरजू लोकांसाठी आमचा आश्रम सदैव खुला आहे.” त्यासाठी मानवसेवा प्रकल्प च्या ८८५५८५०३७८ किंवा ९६८९३३१८५३ यावर संपर्क करावा असे आवाहन संचालक प्रशांत डोंगरदिवे यांनी केले.
या सेवाभावी कार्यामुळे सर्वत्र मानवसेवा फाउंडेशनचे कौतुक होत आहे. यावेळी भाई प्रदीप अंभोरे, भाई विजयकांत गवई, भाई सिद्धार्थ पैठणे, राजू झिने, सुमेध जाधव, भाई सिद्धांत वानखडे, ब्रम्हा साळवे, राज बोर्डे, सलीम भाई, अमोल लहाने, प्रवीण डोंगरदिवे, सतीश साळवे, सतीश पंडागळे हे उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये विठ्ठल माऊलीचे भक्त आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने होते.






