छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
१९ वर्षांखालील मुलींमध्ये संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, तर मुलांमध्ये जे.एम.एस. महाविद्यालय बनोटी संघ विजयी; तालुक्यातील १९ संघांचा सहभाग
सावळदबारा : सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील जय कालिका देवी शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत तालुक्यातील एकूण १९ संघांनी सहभाग नोंदवला. खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत स्पर्धेत चुरशीची लढत दिली. या स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलींच्या गटात संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाने, तर मुलांच्या गटात जे.एम.एस. महाविद्यालय, बनोटीच्या संघाने विजेतेपद पटकावले.
स्पर्धेचे उद्घाटन केंद्रप्रमुख रईस शेख सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जय कालिका देवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाऊराव कोलते पाटील, प्रशासकीय अधिकारी एन. आर. कोलते, संस्थेच्या सचिव रत्नाताई पंजाबराव कोलते पाटील आणि तालुका क्रीडा अधिकारी निलेश गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना वाव मिळावा, त्यांच्यात संघभावना, शिस्त, जिद्द आणि खिलाडूवृत्ती निर्माण व्हावी, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांच्या संघांनी स्पर्धेत सहभाग घेत आपले कौशल्य दाखवले. मैदानावर खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे स्पर्धेत चांगलीच रंगत निर्माण झाली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य जीवन कोलते पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच क्रीडाशिक्षक डॉ. जयराम गोती, विजय सिंह राजपूत, भास्कर खामट आणि सुदाम राठोड यांनी विशेष सहकार्य केले.
या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपले क्रीडाकौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. विजयी संघांचे तसेच सहभागी खेळाडूंचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले.






