जळगाव प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आयोजन; लाभ घेण्याचे माजी सरपंच नितू ठाकूर यांचे आवाहन

जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे गिरीशभाऊ महाजन फाऊंडेशन व रुबीस्टार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मोफत भव्य आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत देऊळगाव गुजरी येथे हे शिबिर होणार आहे.
या शिबिरामध्ये नागरिकांची विविध आजारांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार असून, गरजेनुसार पुढील उपचार, औषधोपचार तसेच शस्त्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे. विशेषतः हृदयरोग तपासणी, सामान्य आरोग्य तपासणी, हाडांची तपासणी व शस्त्रक्रिया, डोळ्यांची तपासणी व शस्त्रक्रिया, महिलांचे विविध आजार, लहान मुलांचे आजार तसेच जनरल शस्त्रक्रियांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
याशिवाय शिबिरात ब्लड प्रेशर व रक्तातील साखरेची तपासणी, औषधोपचार आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा आरोग्यविषयक सल्ला दिला जाणार आहे. आरोग्याच्या समस्या असलेल्या नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन वेळेत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शासकीय योजनांचा लाभ घेऊन उपचाराची सुविधा
या शिबिरामध्ये आवश्यक असलेल्या शस्त्रक्रिया शासकीय योजनेंतर्गत करण्यात येणार असून, पात्र लाभार्थ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी व आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून उपचाराचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे उपचारापासून वंचित राहणाऱ्या नागरिकांसाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार आहे.
देऊळगाव गुजरीसह डाभा, देव्हारी, मोलखेडा, टिटवी, पळसखेडा, नांदा तांडा, हिवरी, तोरणाळा, फत्तेपूर आदी परिसरातील नागरिकांनी या आरोग्य शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन मोफत तपासणी व उपलब्ध उपचार सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी सरपंच नितू ठाकूर, सामाजिक कार्यकर्त्या तथा भारतीय जनता पार्टी, जामनेर तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.






