सिल्लोड प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
बहिणीच्या प्रेमाने सजले आ. अब्दुल सत्तार यांचे मनगट;सिल्लोडमध्ये रक्षाबंधन उत्साहात

सिल्लोड : रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्त सिल्लोड येथे शिवसेना संपर्क कार्यालयात शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट रोजी भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ‘लाडक्या बहिणीं’नी आपले ‘लाडके भाऊ’ आमदार तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मनगटावर राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. सकाळपासूनच सिल्लोड शहरासह तालुक्यातील विविध भागांतून महिला शिवसेना संपर्क कार्यालयात दाखल होत होत्या. हजारो महिलांनी उपस्थित राहून आमदार अब्दुल सत्तार यांना राखी बांधत भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि आपुलकीचा संदेश दिला.
यावेळी महिला भगिनींनी आमदार अब्दुल सत्तार यांचे औक्षण करून त्यांच्या मनगटावर राखी बांधली. रक्षाबंधनाच्या निमित्ताने कार्यालय परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. महिलांच्या मोठ्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष स्वरूप प्राप्त झाले.
कार्यक्रमास शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिला भगिनींशी आमदार अब्दुल सत्तार यांनी संवाद साधत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित महिलांनीही आपल्या भावाला दीर्घायुष्य व यश लाभावे, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
याबाबत माहिती देताना शिवसेना पदाधिकारी गजानन काकडे यांनी सांगितले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही सिल्लोड येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. आमदार अब्दुल सत्तार यांच्याशी सिल्लोड तालुक्यातील महिला भगिनींचे जिव्हाळ्याचे नाते असून, त्याच भावनेतून मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहून त्यांना राख्या बांधल्या.
या कार्यक्रमामुळे रक्षाबंधनाच्या निमित्ताने शिवसेना संपर्क कार्यालयात भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा अनोखा सोहळा पाहायला मिळाला.
यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच हजारो महिला भगिनी उपस्थित होत्या.






