Home / Uncategorized / सावळदबारा येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीचे वाचन; नवीन अर्ज मागविले…

सावळदबारा येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीचे वाचन; नवीन अर्ज मागविले…

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

घरकुलापासून वंचित लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे; सरपंच मो आरिफ मो लुखमान यांचे आवाहन

सावळदबारा, दि. २४ ऑगस्ट : सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील ग्रामपंचायत कार्यालयात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांच्या यादीचे वाचन करण्यात आले. तसेच अद्याप घरकुल योजनेपासून वंचित असलेल्या पात्र नागरिकांकडून नवीन मागणी अर्ज मागविण्यात आले. यावेळी ग्रामसभा उत्साहात व शांततेत संपन्न झाली.

ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच मो. आरिफ मो. लुखमान यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रशासकीय अधिकारी व ग्रामपंचायत सचिव विठ्ठल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही ग्रामसभा घेण्यात आली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची मंजूर लाभार्थी यादी ग्रामसभेत वाचून दाखविण्यात आली.

दरम्यान, गावातील जे पात्र नागरिक घरकुल योजनेपासून वंचित आहेत, तसेच ज्यांच्याकडे पक्के घर नाही किंवा कच्च्या घरात वास्तव्य आहे, अशा नागरिकांनी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुलासाठी नवीन मागणी अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले.

याबाबत बोलताना सरपंच मो. आरिफ मो. लुखमान यांनी सांगितले की, सावळदबारा येथील ज्या नागरिकांना घराची अत्यंत आवश्यकता आहे, बेघर नागरिक तसेच कच्च्या घरात राहणाऱ्या पात्र कुटुंबांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळावा, यासाठी नवीन मागणी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

घरकुल यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांचे अर्ज प्रशासक/ग्रामपंचायत अधिकारी तथा सचिव विठ्ठल राठोड यांच्याकडे ग्रामपंचायत कार्यालयात स्वीकारण्यात येत आहेत.

ग्रामसभेला गावातील पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, पत्रकार बांधव तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसभेच्या माध्यमातून पात्र व वंचित लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार