छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी गोकुळ सिंग राजपूत
20 किमीचा फेरा वाचणार; लाखो भाविकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता
खानदेश–मराठवाडा–विदर्भ जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गाला मंजुरीची अपेक्षा
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध श्रीक्षेत्र जाळीचा देव ते सावळदबारा दरम्यानच्या सिन्हा घाट मार्गाला जिल्हा मार्ग अथवा ग्रामीण मार्ग म्हणून अधिकृत मान्यता देऊन त्यास क्रमांक प्रदान करावा, अशी मागणी भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची मंत्रालयात भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीची सकारात्मक दखल घेत मंत्र्यांनी संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिल्याने परिसरातील नागरिक व भाविकांमध्ये आशावाद निर्माण झाला आहे.
श्रीक्षेत्र जाळीचा देव हे महानुभाव पंथीयांचे महत्त्वाचे श्रद्धास्थान असून येथे श्री चक्रधर स्वामी यांचे भव्य मंदिर आहे. वर्षभर राज्याच्या विविध भागांतून तसेच इतर राज्यांतून लाखो भाविक दर्शनासाठी येथे येत असतात. जाळीचा देव येथे दर्शन घेतल्यानंतर बहुतांश भाविक सावळदबारा येथील चक्रधर स्वामी तीर्थक्षेत्रालाही भेट देतात. मात्र सध्या या दोन धार्मिक स्थळांदरम्यान थेट मार्ग उपलब्ध नसल्याने भाविकांना गिरडा घाट मार्गे सुमारे 25 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो.
प्रस्तावित सिन्हा घाट मार्ग विकसित झाल्यास जाळीचा देव ते सावळदबारा हे अंतर अवघ्या 5 किलोमीटरवर येणार आहे. त्यामुळे भाविकांचा तब्बल 20 किलोमीटरचा अतिरिक्त फेरा वाचणार असून वेळ, इंधन आणि खर्चाची मोठी बचत होणार आहे. तसेच वृद्ध, महिला आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी हा मार्ग अधिक सोयीस्कर व सुरक्षित ठरणार आहे.
इद्रीस मुलतानी यांनी मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की, या मार्गाचे महत्त्व केवळ धार्मिक पर्यटनापुरते मर्यादित नसून तो खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ या तीन विभागांना जोडणारा महत्त्वपूर्ण दुवा ठरू शकतो. या मार्गामुळे सावळदबारा, देऊळगाव गुजरीसह परिसरातील बारा गावांच्या दळणवळण सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार आहे. शेतकऱ्यांना कृषी माल बाजारपेठेत नेणे सोपे होईल, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रवास सुलभ होईल तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा आणि शासकीय सेवांचा लाभ अधिक वेगाने मिळू शकेल.
विशेष म्हणजे सन 1972 च्या भीषण दुष्काळाच्या काळात रोजगार हमी योजनेअंतर्गत या मार्गाचे 50 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण करण्यात आले होते. मात्र आजपर्यंत या रस्त्याला अधिकृत क्रमांक व मान्यता मिळाली नसल्यामुळे पुढील विकासकामे रखडलेली आहेत. परिणामी शासनाचा खर्च झाल्यानंतरही या मार्गाचा अपेक्षित लाभ नागरिकांना मिळू शकलेला नाही.
या रस्त्याला मान्यता मिळाल्यास तो अजिंठा–बुलढाणा राज्य मार्ग तसेच सावळदबारा जिल्हा मार्गाशी जोडला जाणार आहे. त्यामुळे परिसरातील अनेक गावांना पर्यायी व जलद संपर्क मार्ग उपलब्ध होणार असून ग्रामीण विकासाला चालना मिळेल. तसेच धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक रोजगार निर्मिती, लघुउद्योग आणि व्यापारालाही मोठी संधी उपलब्ध होईल.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी या मागणीची सकारात्मक दखल घेत संबंधित विभागाकडून सविस्तर माहिती मागवून तांत्रिक तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रस्ताव व्यवहार्य असल्यास आवश्यक ती कार्यवाही करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे मुलतानी यांनी सांगितले.
श्रीक्षेत्र जाळीचा देव–सावळदबारा सिन्हा घाट मार्गाला मान्यता मिळाल्यास लाखो भाविक, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा लाभ होणार असून धार्मिक पर्यटनासह संपूर्ण परिसराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास इद्रीस मुलतानी यांनी व्यक्त केला आहे.
फोटो कॅप्शन :
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची मंत्रालयात भेट घेऊन जाळीचा देव–सावळदबारा सिन्हा घाट रस्त्यास मान्यता देण्याची मागणी करताना भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी.





