Home / Uncategorized / शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण बंद करा; प्रतापराव जाधवांवर वैयक्तिक टीका खपवून घेतली जाणार नाही!” – युवासेना संपर्क प्रमुख अनमोल ढोरे पाटील यांचा इशारा…

शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण बंद करा; प्रतापराव जाधवांवर वैयक्तिक टीका खपवून घेतली जाणार नाही!” – युवासेना संपर्क प्रमुख अनमोल ढोरे पाटील यांचा इशारा…

 

बुलढाणा | प्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करा, शासनाला जाब विचारा, पण त्याच्या आडून केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर वैयक्तिक टीका करण्याचे राजकारण जिल्ह्यातील जनता सहन करणार नाही, असा थेट इशारा युवासेनेचे संपर्क प्रमुख अनमोल ढोरे पाटील यांनी दिला आहे.

अलीकडच्या काळात काही राजकीय नेत्यांकडून शेतकरी प्रश्नांच्या नावाखाली केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत ढोरे पाटील यांनी संबंधितांवर जोरदार निशाणा साधला. “शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी संघर्ष करण्याऐवजी काही जणांना केवळ प्रसिद्धी आणि राजकीय वैर जपण्यातच रस आहे,” असा घणाघात त्यांनी केला.

ते म्हणाले की, वाढता उत्पादन खर्च, हमीभावाचा अभाव, पीकविमा, वीज समस्या, सिंचनाचा प्रश्न आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. मात्र या गंभीर विषयांवर ठोस भूमिका घेण्याऐवजी काही मंडळी प्रतापराव जाधव यांच्यावरच टीका करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत.

“लोकशाहीत टीका करण्याचा अधिकार आहे, पण टीका धोरणांवर असावी, व्यक्तीवर नाही. प्रत्येक आंदोलनात आणि प्रत्येक प्रश्नात प्रतापराव जाधव यांनाच लक्ष्य करणे हा राजकीय द्वेषाचा प्रकार आहे. जनता हे सर्व पाहत असून योग्य वेळी उत्तर देईल,” असा इशाराही त्यांनी दिला.

ढोरे पाटील यांनी पुढे सांगितले की, प्रतापराव जाधव यांनी जिल्हा पातळीपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास जनतेच्या विश्वासावर केला आहे. अनेक दशकांच्या सार्वजनिक जीवनात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. केंद्रीय मंत्री म्हणून काम करताना त्यांनी विविध योजनांद्वारे जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असून त्यांचे योगदान नाकारता येणार नाही.

यावेळी त्यांनी काही विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका करत म्हटले की, “एका बाजूला आमच्या नेत्यांशी जवळीक दाखवायची आणि दुसऱ्या बाजूला प्रतापराव जाधव यांच्यावर सातत्याने टीका करायची, हा दुटप्पीपणा जनतेच्या लक्षात आला आहे. अशा राजकारणाला जनता कधीच स्वीकारणार नाही.”

“शेतकऱ्यांना आरोप-प्रत्यारोप नकोत, तर हमीभाव हवा आहे. युवकांना घोषणाबाजी नको, तर रोजगार हवा आहे. जनतेला वाद नकोत, तर विकास हवा आहे. त्यामुळे केवळ टीकेचे राजकारण करणाऱ्यांनी जनतेची दिशाभूल थांबवावी,” असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

बुलढाणा जिल्ह्यातील मोठा जनसमुदाय आजही प्रतापराव जाधव यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत असल्याचा दावा करत ढोरे पाटील म्हणाले की, विकासकामे, जनसंपर्क आणि प्रशासनाशी असलेला समन्वय यामुळे त्यांच्याबद्दल जनतेमध्ये सकारात्मक भावना आहे. त्यामुळे केवळ राजकीय आरोपांच्या जोरावर त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत.

“संघर्ष करा, प्रश्न विचारा; पण वैयक्तिक टीका आणि राजकीय सूडबुद्धीचे राजकारण थांबवा. जनता शेवटी काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहते,” अशा शब्दांत अनमोल ढोरे पाटील यांनी विरोधकांना सुनावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार