छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
नागरिकांच्या समस्या जाणून घेत शासकीय कामांच्या तत्काळ निवारणासाठी दिला भर
पंचायत समिती व तहसील कार्यालयात नागरिकांशी संवाद; भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थित
सोयगाव तालुक्यात अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष मा. ईद्रिसभाऊ मुलतानी यांचा जनसंपर्क दौरा बुधवार दि. ३ जून २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. जनतेच्या विविध समस्या, शासकीय कामांतील अडचणी तसेच नागरिकांच्या तक्रारी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने हा दौरा आयोजित करण्यात आला होता.
दौऱ्यादरम्यान मा. मुलतानी यांनी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत पंचायत समिती कार्यालय व तहसील कार्यालय, सोयगाव येथे उपस्थित राहून नागरिकांच्या निवेदने, तक्रारी आणि विविध शासकीय कामांबाबत चर्चा केली. अनेक नागरिकांनी आपल्या अडीअडचणी मांडल्या असून त्यावर संबंधित विभागांशी समन्वय साधून कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले.
यावेळी भाजपचे युवा नेते राहुल राठोड, पंचायत समिती सोयगावचे सभापती उत्तम महारू चव्हाण, प्रा. जीवन कोलते पाटील, शांताराम खराटे, पंढरी साबळे यांच्यासह तालुक्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा जनसंपर्क दौऱ्यांचे महत्त्व असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.
यावेळी बोलताना सभापती उत्तम महारू चव्हाण यांनी सांगितले की, सोयगाव तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपल्या शासकीय कामांसंदर्भातील अडीअडचणी, निवेदने व तक्रारी घेऊन अशा जनसंपर्क कार्यक्रमांचा लाभ घ्यावा. नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
मा. ईद्रिसभाऊ मुलतानी यांच्या या दौऱ्यामुळे अनेक नागरिकांना आपल्या समस्या थेट मांडण्याची संधी मिळाली असून दौऱ्याला तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.






