Home / Uncategorized / छत्रपती शिवाजी विद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी…

छत्रपती शिवाजी विद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी…

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत

कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्वाच्या आदर्शांचा विद्यार्थ्यांना परिचय; मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन

सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात लोककल्याणकारी राज्यकर्त्या, न्यायप्रिय आणि दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना अहिल्यादेवींच्या जीवनकार्याची माहिती देऊन त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन प्रभारी प्राचार्य जीवन कोलते पाटील यांच्या कडून करण्यात आले.

कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष भाऊराव कोलते पाटील तसेच सेवानिवृत्त प्राचार्य एन. आर. कोलते पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संस्थेच्या सचिव सौ. रत्नाताई पंजाबराव कोलते पाटील व प्रभारी प्राचार्य जीवन कोलते पाटील यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनी पुष्पांजली अर्पण करून राजमातांना विनम्र अभिवादन केले.

यावेळी वक्त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकताना सांगितले की, राजमाता अहिल्यादेवी यांनी आपल्या दूरदृष्टी, न्यायनिष्ठा आणि लोकहितकारी धोरणांमुळे भारतीय इतिहासात अजरामर स्थान मिळविले आहे. त्यांनी देशभरातील अनेक धार्मिक स्थळांचे जतन, घाट, मंदिरे, धर्मशाळा आणि सामाजिक विकासाची कामे करून जनतेच्या कल्याणासाठी उल्लेखनीय योगदान दिले. त्यांचे चरित्र हे कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्वाचा त्रिवेणी संगम असून आजच्या पिढीसाठी ते प्रेरणादायी आहे.

मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अहिल्यादेवींच्या आदर्शांचा अंगीकार करून शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीत योगदान देण्याचे आवाहन केले. “स्वराज्य, स्वधर्म आणि स्वसंस्कृतीच्या रक्षणासाठी राजमाता अहिल्यादेवी यांनी केलेले कार्य सदैव प्रेरणादायी राहील. त्यांचे विचार आणि जीवनमूल्ये समाजाला योग्य दिशा देणारी आहेत,” असे मत सेवानिवृत्त प्राचार्य एन आर कोलते पाटील यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालय प्रशासनाने विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी मुख्याध्यापक योगेश खरबडे, गजानन चव्हाण, मो. तालिब, मो. शब्बीर, बाबासाहेब कोलते, अमोल कोलते, अंकुश कोलते, अजाबराव चव्हाण यांच्यासह शिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार