चिखली (प्रतिनिधी) –
चिखली शहरातील चांगाडे परिवारावर अत्यंत दुर्दैवी प्रसंग ओढावला असून, अवघ्या दोन दिवसांच्या अंतरात आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये शोककळा पसरली असून, अनेकांनी या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत संवेदना व्यक्त केल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चिखली येथील रहिवासी स्व. तुळशीदास हरिभाऊ चांगाडे यांचे दिनांक 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी अपघाती निधन झाले. सणाचा आनंद असताना अचानक घडलेल्या या घटनेमुळे चांगाडे परिवारावर दुःखाचा मोठा आघात झाला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर शोक व्यक्त केला.
स्व. तुळशीदास चांगाडे यांच्या निधनानंतर दिनांक 21 मार्च 2026 रोजी त्यांच्या सावडण्याचा कार्यक्रम पार पडला. कुटुंबीय अद्याप या दुःखातून सावरत नसतानाच, त्याच दिवशी रात्री पुन्हा एक दुःखद घटना घडली. त्यांच्या मातोश्री स्व. जनाबाई हरिभाऊ चांगाडे (वय 94) यांचे दिनांक 21 मार्च 2026 रोजी रात्री 10.30 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
आई–मुलाच्या सलग निधनामुळे चांगाडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन दिवसांत दोन जिवलग व्यक्तींना गमावण्याची वेळ आल्याने कुटुंबीयांवर मोठा मानसिक आघात झाला असून, परिसरातील नागरिकही या घटनेने स्तब्ध झाले आहेत.
स्व. जनाबाई हरिभाऊ चांगाडे या अत्यंत प्रेमळ, शांत आणि साध्या स्वभावाच्या होत्या. त्यांनी आपल्या आयुष्यात कुटुंबाला एकत्र ठेवण्याचे कार्य केले होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबातील एक आधारस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, स्व. जनाबाई हरिभाऊ चांगाडे यांचा अंत्यविधी आज दिनांक 22 मार्च 2026 रोजी रविवार सकाळी 10 वाजता हिंदू स्मशानभूमी, जुने गाव चिखली येथे करण्यात येणार आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे चिखली शहरात शोककळा पसरली असून, अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी चांगाडे परिवाराच्या दुःखात सहभागी होत श्रद्धांजली अर्पण केली आहे.
सलग दोन दिवसांत घडलेल्या या घटनेमुळे चांगाडे परिवारावर कोसळलेला दुःखाचा डोंगर पाहून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.






