Muralidhar Mohol: राष्ट्रवादीमध्ये येण्याची ऑफर होती मात्र भाजपमध्येच राहिलो आणि भलं झलं असा गौप्यस्फोट केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलाय. मावळातील तळेगाव दाभाडे येथे झालेल्या विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. मोहोळ यांनी आपल्या भाषणात एक जुना किस्सा सांगून उपस्थितांना खळखळून हसवलं.
Add Zee News as a Preferred Source
दरम्यान मुरलीधर मोहोळ यांना 2019 साली कोणतीही ऑफर नव्हती. पक्षनेतृत्वासमोर ताकद दाखवण्यासाठी मोहळ खोटं बोलत असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांनी केलाय. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्याला राष्ट्रवादीची 2019च्या विधानसभा निवडणुकीत ऑफर होती असा गौप्यस्फोट केलाय. मुरलीधर मोहोळ हे पुण्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. पण त्यावेळी त्यांना पक्षानं उमेदवारी दिली नाही.
मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत सुनील शेळके यांनाही मावळ-वडगाव मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आली होती. सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करुन उमेदवारी मिळवली होती. त्यावेळी सुनील शेळकेंनी आपल्याला फोन करुन राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिल्याचा दावा मुरलीधर मोहोळ यांनी केलाय.
मुरलीधर मोहोळ यांनी केलेला दावा राष्ट्रवादीनं फेटाळलाय. 2019मध्ये मोहोळ यांना पक्षात आणण्याचा कोणाचाही विचार नसल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलंय. भाजपमध्ये स्वतःचं वजन वाढवण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांनी हा दावा केला असावा असा टोला राष्ट्रवादीनं लगावलाय.
सुनील शेळके आमदार झाले पण त्यांना मंत्रिपद मिळालेलं नाही. किंवा राष्ट्रवादीच्या पातळीवर त्यांना कोणतीही मोठी जबाबदारी देण्यात आली नाही. याउलट मोहोळ यांना खासदारकीची उमेदवारी आणि नंतर थेट केंद्रात राज्यमंत्रिपद मिळालं.
भाजपमध्ये श्रद्धा आणि सबुरीचं गोड फळ मिळतं हे सांगण्याचा प्रयत्न मोहोळ यांनी केला असावा. पण अलिकडेच जैन बोर्डिंग जमीन प्रकरणात मोहोळ यांच्यावर आरोप झालेत. त्यामुळं भाजपमध्ये चुकीला माफी नसते याचीही त्यांना कुणीतरी आठवण करुन द्यावी अशी पुणेकरांत चर्चा रंगलीये.
FAQ
प्रश्न: मुरलीधर मोहोळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत नेमका काय दावा केला आहे?
उत्तर: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान पुण्यातून उमेदवारी न मिळाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर मिळाल्याचा दावा केला आहे. त्यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी त्यांना फोन करून पक्षात येण्याची विनंती केली होती, असे ते म्हणाले. मात्र, त्यांनी ही ऑफर नाकारून भाजपमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा फायदा झाल्याचे सांगितले.
प्रश्न: राष्ट्रवादी काँग्रेसने मोहोळ यांच्या दाव्याला कसा प्रतिसाद दिला आहे?
उत्तर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांनी हा दावा फेटाळला असून, २०१९ मध्ये मोहोळ यांना पक्षात आणण्याचा कोणताही विचार नव्हता असे म्हटले आहे. भाजपमध्ये स्वतःचे वजन वाढवण्यासाठी आणि पक्षनेतृत्वासमोर ताकद दाखवण्यासाठी मोहोळ हे खोटे बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
प्रश्न: या प्रकरणामुळे राजकीय चर्चेत काय मुद्दे समोर आले आहेत?
उत्तर: सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीत येऊन आमदारकी मिळवली, पण त्यांना मंत्रिपद किंवा मोठी जबाबदारी मिळाली नाही. याउलट, मोहोळ यांना भाजपमधून खासदारकी आणि केंद्रात राज्यमंत्रिपद मिळाले, ज्यामुळे भाजपची निष्ठा फायद्याची असल्याचे मोहोळ यांनी सूचित केले. मात्र, अलिकडील जैन बोर्डिंग जमीन प्रकरणातील आरोपांमुळे पुणेकरांमध्ये भाजपमध्ये चुकीला माफी नसते याची चर्चा रंगली आहे.