Tenants Rights In India: भारतात घर भाड्याने घ्यायचं म्हणजे फक्त दोन लोकांमधील हिशोब नसतो. तर कायदा, हक्क आणि जबाबदारीदेखील असते. भाडेकरुंना विनाकारण घरातून काढणे, मनमानी भाडे वसुल करणे आणि गोपनीयतेचा भंग होण्यापासून वाचण्यासाठी अनेक नियम व कायदे बनवण्यात आले आहेत. त्यामुळं भाड्याच्या घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या अधिकारांबाबत माहिती असायलाच हवे.
Add Zee News as a Preferred Source
केंद्र सरकारच्या मॉडेल टेनन्सी ॲक्ट, 2021 (MTA) मुळं भाडेकरुंचे अधिकार आणखी मजबूत केले आहेत. पण हा कायदा लागू करणे हे प्रत्येक राज्यावर अवलंबून आहे.
बेदखलीबाबत कायदेशीर संरक्षण
भाडेकरुंचा सर्वात महत्त्वपूर्ण अधिकार मनमानी करुन भाडेकरुला घरातून बेदखल करणे. घरमालक भाडेकरुला तोपर्यंत बेदखल करु शकत नाही जोपर्यंत एखादं वैध कारण असेल. वैध कारणांमध्ये साधारणतः याचा समावेश होतो.
दोन महिने भाडे दिले नसेल
भाड्याच्या घराचा दुरुपयोग केला असेल
अटी शर्थींचे उल्लंघन केले असेल
नोटिशीचा कालावधी
भाडेकरुला घरातून काढून टाकण्याआधी घरमालकाला एक औपचारिक नोटिस देणे गरजेचे आहे. ज्याचा कालावधी सामान्यतः भाडे करारात नमूद केलेला असतो. भाडेकरार संपला असला तरीही, घरमालक न्यायालयाच्या आदेशाशिवाय किंवा भाडे प्राधिकरणाच्या निर्णयाशिवाय भाडेकरूला जबरदस्तीने घरातून बाहेर काढू शकत नाही.
मॉडेल टेनन्सी कायदा, 2021 नुसार, निवासी मालमत्तेसाठी, सुरक्षा ठेव (डिपॉझिट) दोन महिन्यांच्या भाड्यापेक्षा जास्त नसावी. अनिवासी मालमत्तेसाठी, ही रक्कम सहा महिन्यांच्या भाड्यापेक्षा जास्त नसावी.
डिपॉझिट मिळण्याचा अधिकार
भाडेकरूने जागा रिकामी केल्यानंतर, घरमालकाने वैध वजावटी (जसे की मालमत्तेचे नुकसान दुरुस्त करणे) केल्यानंतर उर्वरित डिपॉझिट वेळेवर परत करावी. भाडेवाढ भाडे करारात नमूद केलेल्या अटींनुसार असावी. अचानक आणि अनियंत्रित भाडेवाढीस परवानगी नाही. मॉडेल टेनन्सी कायदा, 2021 अंतर्गत, भाडे वाढवण्यापूर्वी घरमालकाने तीन महिन्यांची लेखी सूचना देणे आवश्यक आहे.
गोपनीयतेचा अधिकार (Right to Privacy)
भाडेकरूंना त्यांच्या भाड्याने घेतलेल्या मालमत्तेत शांततेत राहण्याचा अधिकार आहे. आपत्कालीन परिस्थिती वगळता, घरमालक भाडेकरूच्या पूर्वपरवानगीशिवाय किंवा 24 तासांच्या सूचनेशिवाय घरी जाऊ शकत नाही. तसंच फक्त सकाळी 7 ते रात्री 8 दरम्यानच जाऊ शकतात. भाडेकरूंना पाणी, वीज आणि स्वच्छता यासारख्या मूलभूत सुविधा मिळण्याचा अधिकार आहे; भाडेपट्टी वादाच्या परिस्थितीतही घरमालक या आवश्यक सेवा डिस्कनेक्ट करू शकत नाही.
दुरुस्ती आणि देखभालीचा अधिकार
घरमालकाला मालमत्तेची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. जर घरमालकाने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले तर काही प्रकरणांमध्ये भाडेकरू स्वतः दुरुस्ती करू शकतो आणि भाड्यातून खर्च वजा करू शकतो. भाडेकरू आणि घरमालक दोघांच्याही हिताचे रक्षण करण्यासाठी, लेखी आणि नोंदणीकृत भाडे करार असणे महत्वाचे आहे. हा करार भविष्यातील कोणत्याही वादांचे निराकरण करण्यासाठी आधार बनवतो आणि भाडेकरूचे कायदेशीर अधिकार मजबूत करतो. भाडेकरूला त्याच्या किंवा तिच्या राज्यात लागू असलेल्या विशिष्ट कायद्यांची नेहमीच जाणीव असली पाहिजे.